निगडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहराच्या विकास योजनेतील रस्ते व आरक्षणे विकसित करताना शेतकर्यांना जागेची नुकसान भरपाई अथवा टी. डी. आर. देण्याची तरतूद आहे. तळवडे भाग हा देहूरोड लष्कर हद्दीलगत येत असल्यामुळे तळवडे-चिखली शिवरस्त्यावर विकसित होणार्या रस्त्याला रेडीरेकनर देताना भिन्नता दिसून येते.
तळवडे भागासाठी रेडीरेकनर दर इतर भागाच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे 2024-25 आर्थिक वर्षात रेडीरेकनर दरात सुधारणा करत समानता आणण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी केली आहे.
शहरातील आरक्षणे विकसित होताना नुकसान भरपाई देताना तळवडे भागावरती कायम अन्याय होत आहे. शहरातील इतर भागांच्या पटीत महापालिकेने नुकसान भरपाई तळवडे भागातील शेतकर्यांनाही द्यावी. एकच रस्त्याच्या चिखली भागासाठी एक न्याय व दुसर्या भागात येणार्या तळवडेमधील नागरिकांसाठी वेगळा न्याय का? बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जमिनीचे रेडीरेकनरचे दरही वाढवावे, यासाठी पालकमंत्री यांच्यासह नोंदणी महानिरीक्षण व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे भा.प्र.से. हिरालाल सोनावणे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.