कराड, (प्रतिनिधी) – कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठवड्यापूर्वी चोरीस गेलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार प्रदीप कांबळे नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे तपास करत होते.
बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विंग येथे सापळा लावला असता, एका दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुले संशयितरित्या जाताना दिसली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
ती दुचाकी तांबवे येथून आठ दिवसांपूर्वी चोरल्याचे तिघांनी कबूल केले. कोळे येथे बैलगाडी शर्यतीवेळी पार्किंगमधून बजाज मोटारसायकल आणि मलकापूर पालिकेजवळून एचएफ डिलक्स या मोटारसायकलीही चोरल्याची कबुली तिघांनी दिली.