नीलकंठ मोहिते
इंदापूर-क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या गावी नीरा नदीच्या तीरावर वसलेल्या सराटी (ता. इंदापूर) गावात शुक्रवारी (23 जून) लाखो वारकऱ्याचा समुदाय हरिनामाचा गजर करत, एक दिवसीय मुक्कामासाठी दाखल झाला. शनिवारी सकाळी नीरा नदीमध्ये संत तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना नीरा स्नान घालून, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी गोल रिंगण व मुक्कामासाठी दाखल होणार आहे.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा
करी पापा निर्मुल।
भाग्यवंत छंद म्हणी
कोड कहाणी ऐकती।।
संत तुकाराम महाराज पालखीतील वारकरी विठ्ठलाचे नाव घेत, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत, मालोजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीतून सकाळच्या प्रहरात महापूजेनंतर पालखी सोहळा सराटी गावाकडे मार्गस्थ झाला. वडापुरी गावच्या परंपरेनुसार वडा व पुरी असा अन्नदानाचा नित्यक्रम यंदाही अनेक दिंड्यातील वारकऱ्यांना मोफत पुरवण्यात आला. संत गुलाबबाबा प्रसादिक दिंडीचे प्रमुख हभप सोमनाथ महाराज देहूकर, अंबुताई महाराज देहूकर यांच्या दिंडीत वडापावचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळा विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, शेटफळ पाटी, सुरवड, वकिलवस्तीमार्गे बावडा येथे दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झाला. बावडा येथे पालखीचे स्वागत इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे तसेच इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते संग्रामसिंह पाटील, मनोज पाटील, महादेव घाडगे, अनिल पाटील, धैर्यशील पाटील, विजय घोगरे, उमेश घोगरे, अभिजित घोगरे आदींनी स्वागत केले.
बावडा ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारपेठेतून बाजारतळावरती उभारण्यात आलेल्या शामियानात आणली. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखीस खांदा दिला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे रत्नाई निवासस्थानी हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. बाजारतळावरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.
बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून पालखीने सराटीकडे प्रस्थान ठेवले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी निरा नदीकाठी सराटी येथे दाखल झाला.
आज अकलूज येथे रंगणार गोल रिंगण
अकलूज (जि. सोलापूर) येथील माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण होणार आहे. एकूण तीन गोल रिंगणे पालखीमध्ये होतात. यातील शेवटचे गोल रिंगण अश्व धावून संपन्न होईल. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच आमदार राम सातपुते यांनी अकलूज येथील गोल रिंगण व्यवस्था तसेच पालखी सोहळ्याची व्यवस्था केलेली आहे.