नीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती

नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाइफ सायन्सेस या खासगी कंपनीत आज सायंकाळी विषारी वायूची गळती झाली. या वायुमुळे 35 कर्मचाऱ्याना श्वसनाचा, डोळ्यांचा व उलट्यांचा गंभीर स्वरूपाचा त्रास झाला. त्यांच्यावर नीरा व लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी दोन – तीन रुग्ण अत्यवस्थ असल्याचे समजते. या प्रकाराने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

नीरा- निंबुत गावाच्या हद्दीत असलेल्या ज्युबिलंट कंपनीत आज साडेचार ते पाचच्या सुमारास ॲसेटिक अनहायड्राईडसदृश्य गॅसची गळती (ओव्हरफ्लोमुळे) झाली. हवेच्या झोतामुळे सदर रासायनिक विषारी वायू कंपनीसह आजूबाजूच्या परिसरात पसरला. सदर प्लॅंटच्या जवळील कामगाराना चक्कर येउ लागली. डोळ्यांना व श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यामुळे कामगार- अधिकारी यांच्यात एकच घबराट पसरली. कामगार वाट मिळेल त्या बाजूने कंपनीच्या बाहेर पडले. परंतु 35 लोकांना जास्त गंभीर स्वरुपाचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने नीरा व लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंपनीजवळील पाडेगाव गावातील खरातवस्ती व ताम्हाणेवस्तीमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांनाही श्वसनचा व डोकेदुखीचा त्रास झाला.

कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी दीपक सोनटक्के यांनी,  आता कंपनी बंद करून सगळे लोक बाहेर काढले आहेत. नेमका प्रकार कशाने झाला याचा शोध घेत आहोत अशी जुजबी माहिती दिली. कीती लोक बाधित आहेत आणि कोणता गॅस गळती झाला किंवा ओव्हरफ्लो झाला ही माहिती देण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.