नोटा बदलण्याच्या मुदतीनंतरही जुन्या नोटा बदलून घेणाऱ्यांना सरकार पाठीशी घालतंय – काँग्रेस

नवी दिल्ली (पीटीआय) : काँग्रेसतर्फे आज एका पत्रकार परिषदेद्वारे नोटाबंदीनंतर बेकायदेशीररित्या नोटा बदलून घेणाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेद्वारे हे आरोप लावले असून त्यांनी यापूर्वी ९ एप्रिलरोजी पत्रकार परिषदेद्वारे सादर केलेल्या व्हिडिओंसहच नोटाबंदीनंतर नोटा बदलून घेतानाचे आणखीन काही नवीन व्हिडीओ सादर केले आहेत. यावेळी सिब्बल यांनी नोटाबंदीची अंतिम तारीख संपल्यानंतर देखील नोटा बदलून घेणारे व्हिडिओमधील लोक केंद्रातील भाजप सरकारच्या जवळचे असल्याचे देखील म्हंटलं आहे.

यावेळी, बोलताना कपिल सिब्बल यांनी ‘स्वतःला ‘चौकीदार’ म्हणवणारे मोदी असताना देखील हे सर्व काही का घडलं? ते झोपेत होते का?  मी सादर केलेल्या व्हिडिओंवर चौकशी देखील न होणं म्हणजे ज्यांनी लूट केली आहे त्यांना संरक्षण पुरवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा पुरावा आहे.’ असे आरोप केंद्र सरकारवर केले.

नोटाबंदीच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सिब्बल म्हणाले, “मोदी सरकारद्वारे घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा अवैधरित्या पैसे कमविणाऱ्यांना त्यांचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी झाला. तसेच या निर्णयामुळे देशाची तिजोरी आणि गरिबांचे खिसे रिकामे झाले.”

कपिल सिब्बल यांनी यावेळी बोलताना आपण, ९ एप्रिल रोजी सादर केलेल्या व्हिडीओद्वारे राहुल रथरेकर या कॅबिनेट सचिवालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबाबत खुलासा केला होता. त्यानंतर कॅबिनेट सचिवालयाच्या सेक्रेटरींनी याबाबत खुलासा करताना, “राहुल राथरेकर कॅबिनेट सचिवालयचे एक कॉन्स्टेबल स्तराचे कर्मचारी होते परंतु नोटबंदीनंतरच्या त्यांच्या भूमिकेबद्दल संशय असल्यामुळे जून 2017 मध्ये त्यांना सेवेवरून कमी करण्यात आले आहे.” असं सांगितलं.

“कॅबिनेट सचिवालयाच्या सेक्रेटरींची राहुल राथरेकर यांच्यावरील कारवाई म्हणजे मी सादर केलेल्या व्हिडिओंमध्ये सत्यता असल्याचा पुरावा आहे.” असं देखील कपिल सिब्बल यावेळी बोलताना म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.