महायुतीचे दिवाळं निघाल्याशिवाय राज्यात दिवाळी साजरी होणार नाही

लोणावळ्यात गर्दीचा उच्चांक: खासदार कोल्हे यांची भाजपवर टीका

लोणावळा – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता-भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत भाजप सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्‍मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा. ही अशी निवडणूक असती होय? तसेच या निवडणुकीत महायुतीचे दिवाळं निघाल्याशिवाय राज्यात दिवाळी साजरी होणार नाही, असा घणाघात शिरूरचे खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोणावळ्यात केला.

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अध्यक्ष एसआरपी रमेश साळवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब गायकवाड, नगरसेविका पूजा गायकवाड, नगरसेवक किशोर भेगडे, नंदू हुलवळे, गणेश काजळे, मनीषा राउत, बाबासाहेब गायकवाड, विठ्ठल शिंदे, सूरज गराडे, माधुरी कालेकर, सुनील काजळे, संजय शेडगे, कल्पेश मराठे, नगरसेविका खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष नारायण पाळेकर, उमेदवार सुनील शेळके यांचे वडील शंकर शेळके, नगरसेविका आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड,

काळुराम मालपोटे, रवी पोटफाडे, लोणावळा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, नारायण पाळेकर, एस. आर. पी. पक्षाचे अशोक ओव्हाळ, अनिल गवळी, मनसेचे मावळ तालुक्‍याचे पदाधिकारी आदींसह विविध मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्‍त करताना तिरकस टीका केली. रस्त्यावर 400 कोटी खर्च झाले असते तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके म्हणाले की, जनतेच्या ताकदीवरती विश्‍वास ठेऊनच मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. विरोधक आणि मी एकाच तालमीतले आहोत. भाजपचे राजकारण खालच्या थराचे आहे. गरिबांना नाडले जाते. मी आठ वर्षांपासून तळेगाव नगरपरिषदेत काम करतोय, किती पैसे आले, किती दाखवले गेले, किती पैशांचे काम झाले, हे सगळे माहितेय. जनतेची किती दिशाभूल करायची? महिलांची 2 लाखांच्या पॉलिसी काढण्याच्या नावाखाली फसवणूक केली. 1400 कोटी रुपयांची कामे केली असतील तर ते कुठे गेले? मावळवासियांनो, फक्त एक संधी द्या, असे भावनिक आवाहन शेळके यांनी केले.

भाजप सरकारवर सडकून टिका –
शिरूरचे खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मावळातून तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधून कमळाची पाकळी ठेवायची नाही, असा निश्‍चय आपण सर्वांनी करूया. मतदानानंतर लगेच दिवाळी सुरु होणार आहे. देशातील तसेच राज्यातील समस्या संपवण्यात अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी मावळवासियांना केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.