मेढा: मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल शिंदे यांना १२ मते, तर शिवसेनेच्या नीलम जवळ यांना पाच मते मिळाल्याने अनिल शिंदे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची 11 मतांनी निवड झाली.
निवडीची घोषणा पीठासन अधिकारी मुल्ला व सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ. विद्या पोळ यांनी सभागृहात करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना अशी लढत झाल्याने तालुक्यातील महाआघाडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते . २०१६ मध्ये अनिल शिंदे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते तर दत्ता पवार अपक्ष निवडून आले होते .
या निवड प्रक्रियेसाठी सभागृहातील १७ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी अनिल शिंदे यांना तर उर्वरित पाच सदस्यांनी नीलम जवळ यांना हात उंचावून मतदान केले. मुख्याधिकारी सौ विद्या पोळ यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.
राष्ट्रवादीच्या पारड्यात चार अपक्षांसह , भाजपच्या एका नगरसेवकांनी मतदान केल्याने अनिल शिंदे यांना तब्बल 12 मते मिळाली.
सव्वा वर्षांनंतर पुन्हा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद निवडी होणार : आ .शिवेन्द्रसिंहराजे भोसले
मेढा नगरपंचायतीसाठी झालेल्या या नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष निवडी या सव्वा वर्षांसाठी असून यानंतर दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे तसेच नूतन झालेल्या अध्यक्षानी मेढयाचा विकास करून मेढेकरांची मने जिंकावीत, असे आवाहन आ.शिवेन्द्रसिंहराजे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना केले .