मुंबई -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये पाहता पक्षाला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्या पदावरून पक्षात रस्सीखेच सुरू झाल्याचेही चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे सूतोवाच केले. त्यानंतर अलिकडेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पक्षाचा प्रदेशाध्यक्षही बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. अशातच पक्षाचे महत्वाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी अतिशय सूचक भाष्य केले. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे ती चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही महत्वाचे वक्तव्य केले. ओबीसी समाजातील नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. साहजिकच, राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे मानले जात आहे. त्याशिवाय, त्या पदासाठी इच्छूक असणाऱ्या नेत्यांनी आपली दावेदारीही पुढे करण्याचे तंत्र अवलंबल्याचे दिसते.
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली सदिच्छा
अजितदादांना पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा असल्याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असेच मला वाटते, अशी सदिच्छा सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी समाजाला द्या – भुजबळ
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदी मराठा समाजाऐवजी ओबीसी किंवा इतर समाजाकडे समाजातील व्यक्ती असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. जर विरोधी पक्षनेतेपदी मराठा समाजातील व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष इतर लहान समाजाकडे असावे, असेही त्यांनी सुचविले आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे याचा निर्णय स्वतः शरद पवार घेतील. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि मी स्वतः ओबीसी आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदाचा विचार करावा. ओबीसी नेत्याला अध्यक्ष करावे याबाबत अद्याप माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झालेले नाही. मी केवळ माझे मत मांडत आहे.’