काठमांडू :- ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटावर नेपाळमध्ये घातलेली बंदी तेथील न्यायालयाने उठवली आहे. सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिलेल्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यात येऊ नये, असे न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.
“आदिपुरुष’मधील संवादांमध्ये सीतेला “भारत कन्या’ असे संबोधण्यात आले असल्यामुळे संतप्त झालेल्या नेपाळ सरकारने सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाला नेपाळमध्ये बंदी घातली होती.
काठमांडूचे महापौर बलेंद्र शाह यांनी या निर्णयाची घोषणा केली होती. न्यायालयाने जरी ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरील बंदी उठवली असली तरी नेपाळच्या सार्वभौमत्वाशी आणि स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली जाणार नाही.
यासाठी आपण शिक्षा भोगायला देखील तयार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूरमध्ये झाल्याचे मानले जाते आहे.