अमोल बनकर
सासवड – आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये प्रमुख चार राजकीय पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले असल्याने राष्ट्रवादी आता टाळी देणार का याकडे लक्ष लागले आहे.
तर भाजपाची स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली भूमिका अद्यापर्यंत स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुरंदरमधील सत्ता समोर करणे बदलतील की काय अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचा गाव बैठकांवर जोर
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिवरे येथील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून पहा आपण एकत्र येऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका एकत्र लढू असे जाहीर सांगितले होते. त्यामुळे विजय शिवतारे यांनी सध्यातरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर टीका टिपणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे.
राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने युती करावी अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची देखील चर्चा आहे. सध्या विजय शिवतारे हे आजारी असले तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी येत असतात, त्यावेळी तालुक्याचा आढावा घेऊन गाव बैठका घेण्यावर भर दिला जात आसतो. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकी मध्ये शिवसेनेला मोठे यश संपादन झाले होते.
शिवसेनेकडे सध्या तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक निंबाळकर, शालिनी पवार, अतुल म्हस्के, हरिभाऊ लोळे, गणेश मुळीक, रमेश इंगळे, दत्ता काळे, धीरज जगताप, राजू झेंडे, रमेश जाधव, दादासाहेब घाटे, प्रकाश ताटे, समीर जाधव, भूषण ताकवले हे कार्यरत आहे.
कॉंग्रेसचे विकासकामांवर लक्ष केंद्रित
आमदार संजय जगताप हे तालुक्यातील विविध विकासकामांच्या माध्यमातून गाव गाव फिरत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा याबाबत अद्यापपर्यंत कॉंग्रेस कोणासोबत जाणार हे कोणत्याही व्यासपीठावरून सांगण्यात आलेले नाही त्यामुळे कॉंग्रेसची भूमिका ही अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच आहे.
गेल्या पंचवार्षिकमध्ये कॉंग्रेसच्या ताब्यामध्ये सर्वांत कमी ग्रामपंचायती आसताना व कोणतीही सत्तास्थाने नसताना देखील बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे दोन सदस्य निवडून आणण्यात यश आले होते. तर तालुक्यामध्ये अनेक विकासकामे सध्या सुरू असल्याने कॉंग्रेसची ताकद देखील वाढली आहे.
कॉंग्रेसमध्ये सध्या कॉंग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, सुनिता कोलते, सोनाली यादव, माऊली यादव, भाऊसाहेब दळवी, सचिन दुर्गाडे ऍड. विजय भालेराव, विकास इंदलकर, माऊली वचकल, दिलीप धुमाळ, मयूर मुळीक, निलेश जाधव, सागर मोकाशी, राजेश काकडे, महिंद्र माने, सचिन दाते, सुधीर निगडे, गुलाब गायकवाड, महेश खैरे हे पक्ष वाढीसाठी काम करीत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विकासनिधी देण्यावर भर
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रामपंचायतीमध्ये विकास निधी टाकण्याचा प्रयत्न करीत असून त्या विकासकामांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणे त्याचबरोबर करोनाकाळामध्ये किराणा साहित्य वाटपाचा माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मतदारांनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सध्या तरी राष्ट्रवादीकडून कोणासोबत युती करायची आहे ठरविण्यात आले नसल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे; परंतु काही कार्यकर्ते कॉंग्रेस सोबत जाण्यास इच्छुक आहेत. तर काही कार्यकर्ते शिवसेने सोबत जाण्यास इच्छुक आहेत. पक्षाकडे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे, सुदामराव इंगळे,
संभाजीराव झेंडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शामराव भिंताडे, राजेश चव्हाण, भैय्यासाहेब खाटपे, दत्ताआबा चव्हाण, बापू भोर, राजेंद्र धुमाळ, पुष्कराज जाधव, सौरभ कुंजीर, गौरी कुंजीर, पिंटू जगदाळे, ईश्वर बागमार, बापू बडदे आदी नेते व कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी काम करीत आहेत.
भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी
भाजपच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांचे दौरे होत आहेत. पुरंदरच्या भाजपा कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या स्वबळावर लढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आले आहेत. तर कधी नव्हे ते पुरंदरमधील काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता स्थापन करण्यात मोठे यश मिळवले आहे.
यामुळे भाजपाच्या कार्यकर्तेत देखील उत्साहाचे वातावरण आहे. पुरंदर तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी नुकतीच गंगाराम जगदाळे यांची वर्णी लागली असल्याने कार्यकर्त्यांना ताकत देणार असल्याचे सुचवत जगदाळे यांनी एका बैठकीत केले होते. भाजपाच्या पहिल्याच बैठकीत कार्यालय फुल्ल झाल्याने गंगाराम जगदाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
तर भाजपामध्ये तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, निलेश जगताप, श्रीकांत ताम्हणे, सचिन लंबाते, शैलेश तांदळे, ऋतुजा जाधव, कैलास जगताप, सुजाता दगडे हे नेते, कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी काम करीत आहेत.
पक्षीय बलाबल
पुरंदर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य आहेत. त्यापैकी सध्या शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद व सात पंचायत समिती सदस्य असून कॉंग्रेसकडे दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद सदस्य आहे.