सहकारनगर, – पुणे महापालिका शहरी गरीब योजने अंतर्गत शहरी गरीब कार्डधारकांना मोफत औषधे उपलब्ध करून देते. याकरिता आवश्यक औषधांसाठीची 3 कोटी रुपयांची निविदा गुरूवारी (दि.24) ऑनलाइन प्रकाशित करण्यात आली. यामध्ये यावर्षी औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास दोन वर्षे अनूभव असावा, अशी अट नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. मागील वेळी ही अट नसल्याने अनेक ठेकदार, कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यातून दरात सवलत मिळाल्याने पालिकेच्या निधीची मोठी बचत झाली होती. परंतु, यावेळी मात्र नव्याने अट समाविष्ट करण्यात आली आहे. ठराविक ठेकेदारांनाच याचा अनुभव असल्याने निविदा भरणाऱ्यांची संख्याही कमीच असणार आहे. यातून स्पर्धाच राहणार नसल्याने सवलतही मिळणार नाही, त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते, या कारणास्तव नव्याने टाकण्यात आलेली अनुभवाची अट रद्द अथवा शिथिल करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने महापलिकेकडे करण्यात आली आहे.
महापालिकेने सदर योजनेसाठीची अट रद्द केल्यास यातून संबंधीत औषध पुरवठा ठेकेदार, कंपन्या किमान 21 टक्के आणि त्यापेक्षा अधिक सवलत देऊ शकतात, यातून अंदाजे 63 लाखांपेक्षा जास्त निधीची बचत अथवा त्यातून अधिकची औषधे उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे सदर निविदेमधील जाचक अट रद्द किंवा शिथील करून याच लाभ पुणेकरांचा करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.
अट नक्की कशासाठी?
औषध पुरविण्याचा अनुभवाची जाचक अट नक्की कशासाठी? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. या योजने अंतर्गत देण्यात येणारी औषधे यीाच माहिती निविदा भरणाऱ्यांना तसेच पुरवठादारांन असते. त्यामुळे अनुभवाची अट का आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य यंत्रणेलात यांच्याच मर्जीतील पुरवठादार ठेकेदारांची निविदा मंजूर करायची असल्यानेच अशा योजनेला औषण पुरवठा करण्याच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.