राजकीय रणसंग्राम
मावळ विधानसभेसाठी 11 जणांचे अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडीकडून रमेश ओव्हाळ यांची उमेदवारी
पिंपरी – मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 4) अखेरच्या दिवशी नऊ अर्ज दाखल झाले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सुनील शंकरराव शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे 11 उमेदवारांनी 16 अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. गुरुवारपर्यंत सहा उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शन करीत सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे रमेश आनंदा ओव्हाळ यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय दिवसभरात सारिका सुनील शेळके राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तसेच खंडू बाळाजी तिकोणे, मुकेश मनोहर अगरवाल, दीपक यशवंत लोहर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर
केले आहेत.
…यांनी भरले उमेदवारी अर्ज
संजय उर्फ बाळा भेगडे (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), गुलाबराव म्हाळसकर (भाजपतर्फे), मंदाकिनी भोसले (बहुजन समाज पक्ष), रमेश ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी), रवींद्र भेगडे (अपक्ष), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष). सारिका सुनील शेळके (राष्ट्रवादी तर्फे), खंडू बाळाजी तिकोने (अपक्ष), मुकेश अगरवाल (अपक्ष), दीपक लोहर (अपक्ष).