पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्याचा घोळ राष्ट्रवादीने शेवटच्या दिवशीही कायम ठेवला. चिंचवडमधून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देतानाच पिंपरीतील उमेदवार आयत्यावेळी बदलत माजी आमदार अण्णा बनसोडे यांना “ए’ “बी’ फॉर्म देण्यात आला. विशेष म्हणजे सुलक्षणा शिलवंत आणि अण्णा बनसोडे या दोघांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून भोसरीत मात्र या पक्षाला उमेदवारच न मिळाल्याने माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली.
पिंपरी-चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. या पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या उड्या पडत होत्या. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र उमेदवारीचा घोळ गेल्या महिनाभरापासून पक्षाच्या वरिष्ठांनी कायम ठेवल्यामुळे इच्छुकांना गळती लागली. प्रचंड तयारीत असलेल्या इच्छुकांवर टांगती तलवार ठेवण्यात आल्यामुळे अनेकांनी निवडणुकीतून अंग काढून घेण्यातच धन्यता मानली. अत्यंत कमी मिळणारा वेळ, विरोधकांची तगडी ताकद आणि वरिष्ठांकडून न मिळणारी रसद यामुळे पिंपरी वगळता या पक्षाकडे उमेदवारच नसल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात दिसून आले.
चिंचवड विधानसभेसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. तर पिंपरीतून नवख्या असलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या प्रकारामुळे पिंपरीतील इच्छुकांनी बंडाचे निशान फडकाविल्यानंतर आयत्यावेळी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना जाग आली आणि रात्रीत “भाकरी फिरली’. माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मध्यरात्री उमेदवारी देण्यात आल्याचे कळविण्यात आले. मात्र दोघांनाही “ए’ “बी’ फॉर्म देण्यात आल्याने दोघांनीही अधिकृत म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे सोमवारीच कोण अधिकृत उमेदवार असणार हे स्पष्ट होणार आहे.
भोसरीत राष्ट्रवादीची सर्वाधिक नाचक्की झाली. माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांची पक्षाने मनधरणी केली मात्र कोणीच उमेदवारी स्विकारली नाही. शेवटी अजित पवार यांच्याशी चर्चा करून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विलास लांडे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय जाहीर झाला. अगोदरच पक्ष जनाधार गमावित असताना पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी वरिष्ठांनी स्थानिकांचे खच्चीकरण केल्याचा प्रकार गेल्या महिनाभरात दिसून आला. नगरसेवकांना विश्वासात न घेणे, पक्षासाठी घातक असलेल्या लोकांवरच विश्वास ठेवणे आणि मनमानी यामुळे शहरात उरला सुरला पक्ष आणि कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चिंचवडमध्येही अपक्ष पुरस्कृत?
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृत उमेदवार जाहीर केला असला तरी अपक्ष उमेदवार व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पुरस्कृत करणार असल्याची चर्चा शुक्रवारी रंगली होती. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढविणार की भोसरीप्रमाणेच चिंचवडमध्येही अपक्ष उमेदवार पुरस्कृत केला जाणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे.