…आणि सुळे यांनी गाडी वळविण्यास सांगितले

चालकाच्या मतदानाकरिता दाखविली तत्परता

बारामती – लोकशाहीतही एका-एका मताचे मूल्य अमूल्य आहे. हे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाखवून दिले. आपल्या मोटारीच्या चालकाचे मतदान आठ किलोमीटर आतील गावामध्ये आहे, हे लक्षात येताच त्यांनी नियोजित दौऱ्याचा रस्ता बदलून तावशी (ता. इंदापूर) गाव गाठले आणि तेथे चालकाचे मतदान होईपर्यंत त्या थांबून राहिल्या!

बारामतीतील बालनिरीक्षण गृह मतदान केंद्रात आज सकाळी मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी सुळे निघाल्या होत्या. बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडीमार्गे त्या इंदापूर तालुक्‍यातील पहिले गाव भवानीनगरमध्ये पोचल्या. तेथून त्या सणसर येथे पोचल्या. सणसरमधील मतदान केंद्र मोठे असून, येथे गर्दी केलेल्या मतदारांना नमस्कार करून बूथप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि त्या इंदापूर-बारामती रस्त्याने पुढे जाचकवस्ती, बेलवाडी, लासुर्णे अशा मार्गाने निघाल्या.

मात्र, अचानक त्यांनी चालक गणेश कांबळे याला, मतदान केले का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने, मतदान तावशी येथे असून, आता घाई असल्याने मतदान करता येत नसल्याचे सांगितले. त्यावर सुळे यांनी त्यास गाडी वळवून कुरवली रस्त्याने तावशीकडे नेण्याची सूचना केली. तावशीत त्या पोहचल्या. अनपेक्षितपणे त्यांनी तावशी केंद्रात भेट दिल्याने राष्ट्रवादी व कॉंग्रेसचेही कार्यकर्ते अवाक्‌ झाले. त्यांनी मतदान केंद्राबाहेर एका दुकानाच्या बाहेर बसून कार्यकर्त्यांशी व मतदारांशी चर्चा केली. कांबळे यांचे मतदान होईपर्यंत त्या तेथेच थांबून होत्या. मतदान झाल्यानंतरच त्यांची गाडी मधल्या रस्त्याने लासुर्णे गावात पोहचली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.