मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मुंबईतील पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षातून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या फोटोला काळे फासले.
अजित पवार यांच्या नेतृत्त्वातखालील राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राज्यातील वेगवान घडामोडींमुळे अनेक चर्चांना उधाण आले.
अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सेल प्रमुख, युवक, युवती, महिला या पक्षासोबतच आहेत. आजच्या शपथविधीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नसल्याचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. आजचा शपथविधी हा “ऑपरेशन लोटस’चाच भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.