मुंबई – दाऊद इब्राहिमच्या संबंधितांकडून मालमत्ता विकत घेताना मनी लॉंडरिंग केल्याच्या आरोपावरून राज्याचे अल्पसंख्यांक अिांण कामगार मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) बुधवारी अटक केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ईडीचे पोलीस मलिक यांच्या घरात घुसले. त्यांनी चौकशीसाठी त्यांना न्यायालयात नेले. तेथे आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना महानगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या कारवाईने राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या अटकेनंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर यांची कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल किमतीने विकत घेताना मनी लॉंडरिंग करण्यात आले असावे, असा संशय ईडीला आहे.
हा मालमत्तांचा व्यवहार मनी लॉडरिंग कायदा लागू होण्यापुर्वीच्या काळातील आहे. त्यामुळे केवळ राजकीय आकसामुळे जुने व्यवहार उकरून काढून अटकेची कारवाई करण्यात येत असल्याचा दावा नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला. तर हसिना पारकर हिचा साथिदार सलीम पटेल याने हसिना पारकर यांच्याकडून कुलमुखत्यार पत्र घेऊन हा व्यवहार केल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला. मात्र हा सलीम पटेल आणि हसिना पारकर यांचा हस्तक सलिम पटेल या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक
मलिक यांच्या अटकेच्या कारवाईनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते यावेळी अटकेनंतर घ्यावयाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत मलिक यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष राज्य सरकार पाडण्यासाठी वापर करत आहेत. याविरोधात पुण्यासह राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्रीय तापास यंत्रणांचा निषेध असो, केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
ईडीबाहेर आंदोलन
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. कार्यकर्ते कार्यालयात घुसण्याच्या तयारीत असल्याचा समज निर्माण झाला. त्यामुळे तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला. तेवढ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले.
महाविकास आघाडीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक सायंकाळी उशीरा घेण्यात आली. या बैठकीत केंद्र सरकारविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही खबरदारी पाळून केंद्राच्या दादागिरीला सामोरे जावे लागेल. तसेच अशा कारवाया करून घाबरवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू असला तरी त्याला भीक न घालता जशास तसे उत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे या बैठकीत सहभागी झाले होते.