नवी दिल्ली – चीनमध्ये नौदलाचे कमांडर जनरल डोंग जून यांना देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दोनच महिन्यांपूर्वी जनरल ली शांगफू यांना कोणतेही स्पष्टिकरण न देता संरक्षण मंत्रीपदावरून हटवण्यात आले होते. चीनच्या नॅशनल पीपल्स कॉंग्रेसने ऑक्टोबर महिन्यात ली शेंगफू यांना संरक्षण मंत्रीपदावरून हटवल्याचे जाहीर केले.
संरक्षण मंत्री पदावर नियुक्त करण्यात आलेले जनरल डोंग जून हे पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचे कमांडर आणि चीनच्या सर्व शक्तीमान सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रमुख आणि सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सरचिटणीस देखील आहेत.
पूर्वीप्रमाणे आताही कोणतीही पूर्वसूचना न देता ली शेंगफू यांच्या जागेवर जनरल डोंग जून यांना संरक्षण मंत्री पदावर नियुक्त केले गेले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री असलेल्या किन गांग यांनाही कोणतेही स्पष्टिकरण न देता परराष्ट्र मंत्री पदावरून काढून त्यांच्या जागेवर वँक यी यांना परराष्ट्र मंत्री नियुक्त केले गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीला वँग यी यांच्याच जागेवर किन गांग यांना परराष्ट्र मंत्री केले गेलेले होते.
ली आणि किन गांग या दोघांचेही नंतर काय झाले, हे अखेरपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. ली हे ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांना पदावरून हटवले जाण्याचेही कोणतेही कारण दिले गेले नाही. रशियाकडून शस्त्रेखरेदी केल्यामुळे ली यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले होते. असे निर्बंध घातलेले ते चीनचे पहिले संरक्षण मंत्री होते.