मुंबई – तलाठी भरती घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण 5 सप्टेंबरला पोलिसांनी औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राच्या बाहेरुन राजू नागरे याला अटक केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक मोठे मासे असण्याची शक्यता आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपर फुटी प्रकरणात मूळ पेपर नागपुरातून फोडण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर पाठवण्यात आले होते. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्यभरात तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. छत्रपती संभाजीनगर येथील एका केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली असल्याचे समोर आले होते.
मात्र प्रत्यक्षात याचा सखोल तपास संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठविण्यात आले होते, असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.