टाकळी ढोकेश्वर -निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा टाकळी ढोकेश्वरसह परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.अनेक ठिकाणी फळबागा, टोमॅंटो पिके पूर्णपणे उद्धवस्त झाले असून घरे, दुकानांचे पत्रे, विजेचे पोलसह असंख्य झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे बुधवार सायंकाळी निसर्ग चक्रीवादळाचा जोर एवढा मोठा होता की यामध्ये मांडओहळ खोऱ्यातील शेकडो टोमॅंटो उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. तर असंख्य ठिकाणी घरांसह जनावरांचे गोठे उघडे पडले.
दुकानांचे पत्रे उडून गेले असून असंख्य मोठ मोठी झाडी उन्मळून पडली. तर दुसरीकडे गेल्या सहा वर्षात प्रथमच रोहीणी नक्षत्र बरसल्याने शेतसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याने मुग, उडीद, राजमा, भुईमुग, बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण दिसू लागले आहे.
पंचनामे करण्याची मागणी
मांडओहळ खोऱ्यातील गुरेवाडीचे कैलास आगळे, कामटवाडीचे कारभारी आहेर यांची टोमॅंटो तर अशोक आगळे यांचे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याची मागणी यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.