मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उभ्या फूटीनंतर पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार यांच्या गटाने विधीमंडळात दाखल केली आहे. या याचिकेनंतर या संदर्भात आपापले म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली होती.
या नोटिसीला अजित पवार गटाच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या वतीने या संदर्भात विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ आमचाच असा दावा अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादी आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा देखील अजित पवार गटाने केला होता. त्यांनतर शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस विधिमंडळात दिली होती. त्याला अजित पवार गटने उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यामुळे अध्यक्ष यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली आहे.
शरद पवार गटाचे १० पानी उत्तर –
विधीमंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. शरद पवार गटाच्या आमदारांचे उत्तर देखील विधिमंडळात पाठवण्यात आले आहे. हे १० पानी उत्तर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांकडे दोन्ही गटाची उत्तरे प्राप्त झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची मुदत –
विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कोणत्या गटाला दिलासा मिळतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.