पिंपरी – जालना जिल्ह्यातील विविध मागण्यासाठी मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन केले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनाला विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, विशाल जाधव, संदीप चव्हाण, अनिल भोसले, शिवाजी पाडाळे, ओम शिरसागर, विकास कांबळे, रजनीकांत गायकवाड, मयूर खरात, अमोल बेंद्रे, शाहिद शेख, पियूष अंकुश, स्वप्नाली आसोले, बिरुदास मोटे, काशिनाथ जगताप, राजेश हरगुडे, नितीन मोटे आदी उपस्थित होते.
युवक शहराध्यक्ष शेख म्हणाले, राज्यातील प्रत्येक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे. या सरकारने दिव्यांग, वारकरी, विद्यार्थी आणि आता मराठा आंदोलक यांच्यावर पोलिसांकरवी हल्ला करवून हुकुमशाहीचे प्रत्यंतर दाखवले आहे.
कामगार नेते नखाते म्हणाले, महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान व लोकशाही मार्गाने आंदोलने करणाऱ्यावर दडपशाही करण्याचे प्रकार भाजपच्या काळात वाढले आहेत. फडणवीस सरकारने न टिकणारे मराठा आरक्षण देऊन दिशाभूल केली. लाठीचार्ज करणाऱ्यांचे आदेश देणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही.