फर्गसनमध्ये तुफान घोषणाबाजी
नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला विरोध आणि समर्थन
सोमवारी सर्व महाविद्यालय बंदची दिली होती हाक
पुणे – नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने सोमवारी सर्व महाविद्यालय बंदची हाक दिली होती. त्याबाबतचे निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते फर्गसन महाविद्यालयात आले होते. त्याचवेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कार्यकर्ते व अन्य युवकांनीही महाविद्यालय बंदची आंदोलन नियमबाह्य असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फर्गसनमध्ये आमनेसामने येत “एनआरसी’च्या निषेधार्थ व समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे फर्गसनमध्ये वातावरण काही काळ तणावाचे होते.
नवी दिल्लीच्या जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार व “एनआरसी’ व “सीएए’ या कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रसने रविवारी शहरातील सर्व महाविद्यालय बंदची हाक दिली होती. त्यानंतर दुपारी 2 वाजता निषेधाची सभेच्या निमित्ताने कार्यकर्ते प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, प्राचार्य नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून आंदोलनाला बसले.
त्याचवेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते फगर्सनमध्ये हातात तिरंगा घेत या संघटनांच्या समोर ठिय्या मांडून बसले. “सीएए’ कायद्याला समर्थन अथवा विरोध करणे हा सर्वांनाच अधिकार आहे. प्रत्येकांची विचारांची धारा वेगळू असू शकते. त्यासाठी आंदोलन करण्यास काहीच हरकत नाही. हे आंदोलन महाविद्यालयाच्या बाहेर झाले असते, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. मात्र, महाविद्यालयाच्या आवारात येऊन बंदची भाषा कदापी सहन करणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे होते.
यावरुन फगर्सन महाविद्यालयात घोषणाबाजी होऊ लागली. एक संघटना कायद्याचा समर्थनार्थ व दुसरी संघटना कायद्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीने महाविद्यालय परिसर दणाणून गेले. अचानक काय झाले, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली. वातावरण फारसे ताणले जाणार नाही, अशा परिस्थितीत पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. त्यांनी दोन्ही संघटनेचा घोषणाबाजी बंद करण्यास सांगितले. एवढेच नव्हे, पोलिसांचे शिघ्र कृती दलही दाखल झाले. त्यानंतर वातावरण पूर्वपदावर आले.