सुपा – नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथे दुचाकीला जीपने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी जीप चालकाविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपा पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.22) सायंकाळी सहाच्या सुमारास पुण्याहून नगरकडे जात असलेल्या जीपची (क्र. एमएच- 16 बीवाय- 4428) पळवे फाटा येथे रस्ता ओलंडणाऱ्या दुचाकीस जोरादार धडक बसली. धडक एवढी जोरादार होती की दुचाकीवरील ज्ञानदेव दगडू बुगे (वय 52, रा. बुगेवाडी, ता. पारनेर) हे जागीच ठार झाले, तर खंडू जयवंत शेरकर (वय 55, रा. सोबलेवाडी, ता. पारनेर) यांना सुपा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
याबाबत सुपा पोलीस ठाण्यात जीपचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले करत आहेत.
दरम्यान नगर-पुणे महामार्गावर अपघात नियंत्रणाबाबत केलेल्या उपाययोजना तोडक्या पडत असून, या महामार्गावर मरण स्वस्त झाल्याचे दिसून येते आहे. तालुक्यात नव्याने सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे सुपा ते म्हसणे फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.
म्हसणे फाटा येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते, यामुळे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरसोबत वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांसह प्रवाशांमधून केली जात आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी या ठिकाणीच दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला होता. अद्याप अपघाताची मालीका सुरूच आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.