आठवडाभरात दुसऱ्या मशीनदेखील होणार कार्यान्वित
पुणे – खोदाई मशीनच्या (टनेल बोरिंग मशीन) सहाय्याने मेट्रोच्या भुयारी मार्गाची खोदाई कृषी महाविद्यालय येथे 13 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 100 मीटर टनेलची खोदाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, दुसरी खोदाई मशीनदेखील आठवडाभरात कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.
महामेट्रोतर्फे सोमवारी भुयारी मेट्रोच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी गाडगीळ यांनी भुयारी मेट्रोच्या कामकाजाची माहिती दिली. मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भुयारी मार्गाचा आहे. हा 5 किमीचा भुयारी मार्ग बनविण्यासाठी अद्ययावत टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहे. यासाठी एकूण 4 टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहे. त्यापैकी एका टनेल बोरिंग मशीनद्वारे खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. तर आठवड्याभरात दुसऱ्या मशीनद्वारेदेखील खोदाईला सुरुवात होणार आहे.
या टनेल बोरिंग मशीन्सला मुळा आणि मुठा अशी नावे देण्यात आली आहेत. या मशीन्स हॉंगकॉंग येथील “टेराटेक कंपनी’च्या असून, चीनमधील कारखान्यात बनवण्यात आल्या आहे. मेट्रोने निवडलेल्या “टीबीएम’ या संगणकाद्वारे नियंत्रित या मशीन्स आहेत. यामध्ये सुरक्षा संबंधी जागतिक दर्जाची प्रणाली वापरण्यात आली आहे.
टनेलमध्ये हवेचा दाब आणि ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड आणि इतर वायूंचे सेन्सर लावले आहेत. तसेच, टनेल व्हेंटिलेशन प्रणालीद्वारे त्यावर नियंत्रण ठेवण्यात येते. या मशीन्स 24 तासांमध्ये 6 मीटर ते 7 मीटर टनेलचे काम पूर्ण करते. चार मशीनच्या सहाय्याने पुढील 2 वर्षांत भुयारी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.