अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापतीपदांकडे लक्ष
पुणे – जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रतिक्षा संपली, आता समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या आठ दिवसांत आरोग्य व बांधकाम, समाजकल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन तसेच महिला व बालकल्याण या चारही सभापतींची निवड होणार आहे. त्यामध्ये चारही सभापती राष्ट्रवादी कॉग्रेसचे असणार की, याठिकाणी राज्यात राबविलेला महाविकास आघाडी धर्म पाळण्यात येणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
अध्यक्षपद खेड तर उपाध्यक्षपद भोर तालुक्याला गेल्यामुळे हे दोन तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यांतून चार सभापती निवड करणे पक्षापुढे आव्हान आहेच; कारण नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नाराजी, दबावतंत्र आणि राजीनामानाट्य यामुळे दोन्ही पदांची नावे जाहीर करताना पक्षाला चांगलीच कसरत करावी लागली.
त्याप्रमाणे आता सभापती पदाची नावे जाहीर करतानाही रूसवे-फुगवे पाहूनच पक्षाला निर्णय घ्यावा लागणार हे निश्चित. त्यातच या निवडीमध्ये महाविकास आघाडी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 13 तर कॉंग्रेसचे 7 सदस्य आहेत. त्यामुळे चार सभापतींपैकी एक पद महाविकास आघाडीला द्यायचे म्हटले तर शिवसेनेच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडू शकते; मात्र कोणत्या विभागाचे सभापती पद मिळणार?
नाराजांना गोंजारण्याचा प्रयत्न
शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत खेड व भोर तालुक्याला संधी देण्यात आली. खेड तालुक्यातून आमदार दिलीप मोहिते, तर भोरमधून आमदार संग्राम थोपटे हे मंत्रीमंडळात समावेशासाठी दावेदार होते. मंत्रीमंडळ विस्तारात या दोघांनाही डावलल्यानंतर याचे पडसाद कार्यकर्त्यांमधून पाहायला मिळाले. दोन्ही तालुक्यांत प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काही प्रमाणात केला गेला आहे. आता विषय समित्यांचे सभापती निवडतानाही हा फॉर्म्युला वापरला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.
जुन्नर, मावळ, मुळशी, पुरंदरला अपेक्षा
सभापतीच्या निवडीमध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून महिला सदस्याला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पुरूष गटातून सभापतीची संधी मिळण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन, समाजकल्याण तसेच आरोग्य व बांधकाम हे तीनच सभापतीपद आहे. त्यामध्ये इच्छुकांची संख्या डझनभर आहे. याआधी तीन वर्षांत बारामती, आंबेगाव, शिरूर, दौंड, इंदापूर व हवेलीला संधी मिळाली आहे. तर अध्यक्ष-उपाध्यक्ष आता अनुक्रमे खेड व भोरचे झाल्याने उर्वरित जुन्नर, मावळ, मुळशी, पुरंदर आणि वेल्हे यांपैकी चार तालुक्यातील इच्छुकांना सभापतीचा बहुमान मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.
मित्र पक्षाला सभापतीपद द्यायचेच झाले तर कोणते?
जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदानंतर बांधकाम आणि आरोग्य सभापतीपद हे महत्वाचे मानले जाते. या विभागाचे बजेट आणि कामाचा व्याप मोठा आहे. त्याखालोखाल समाजकल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन तसेच महिला व बालकल्याण समितीचा क्रमांक येतो. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षाला एखादे सभापतीपद द्यायचे ठरविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणते पद देणार? हा प्रश्न आहेच. मात्र, मित्र पक्षाकडूनही बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदासाठी आग्रह धरला जाणार हे निश्चित.