नाशिक – नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडलीय. निवडणुकीपू्र्वी नगरसेवकांच्या सहलीत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविकेचा आज रविवारी सकाळी वापीमधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काशीबाई नामू पवार, असे मृत नगरसेविकेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुरगाणा नगरपंचायतीत एकूण 17 जागा आहेत. सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. तर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा मार्ग अतिशय सुकर आहे. त्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावरून राजकारणही टिकेला पोहचले आहे. अशातच सुरगाणा नगरपंचायतीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने काढलेल्या सहली दरम्यान एका नगरसेविकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक 16 मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपच्या गटातील नगरसेवकांसह नगरसेविकांची सहल काढण्यात आली होती. ऐनवेळी येवून आपले बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेला काळाने गाठल्याने भाजप पुन्हा एकदा वादात सापडले आहे.