पाथर्डी (प्रतिनिधी) –पोलीस ठाण्याच्या आवारातून टॅंकरमधील बायोडीझेल दुसऱ्या टॅंकरमध्ये भरुन चोरी करताना तिघांना पोलिसांनी पाहीले. पोलीस दोघेजण असल्याने तिघांनी त्यांना धक्काबुक्की करुन पोलीस ठाण्याच्या आवारातून पळ काढला. सरकारी कामात अडथळा आणुन कट रचुन डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यापैंकी एकासह सहभागी असणाऱ्या एका पोलीस नाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भागवत चेमटे व पोलीस कर्मचारी दिपक शेंडे असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तिघेजण पळाले आहेत. दोन बायोडीझेल टॅंकर पोलीस ठाण्याच्या समोर उभे आहेत.
गुरुवारी रात्रीनंतर पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या बाहेर खट-खट असा आवाज आला. कर्तव्यावर असलेले ठाणे अमंलदार पोलीस नाईक ईश्वर गर्जे ठाण्याच्या समोर गेले. बाहेरची खांबावरील लाईट बंद केली होती. तेथे पुर्वीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या टॅंकरशेजारी दुसरा एक टॅंकर उभा दिसला. तसेच टॅंकरमधील बायोडीझेल इंजिनच्या सहाय्यने एका टॅंकरमधून दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्याचे काम सुरु होते. येथे भागवत काशिनाथ चेमटे (रा.शिंगोरी,ता.शेवगाव), असिफ रफिक शेख (रा.पाथर्डी), दिपक आरोळे (पुर्ण नाव माहित नाही) हे तिघेजण उपस्थित होते.
ईश्वर गर्जे व किरण बडे या दोघांनी डीझेल चोरतांना पाहिले असता त्यांना विरोध केला. त्यावेळी सुरवातीला दोघेजण पळाले. भागवत चेमटे याला पकडले, मात्र त्याचे साथीदार दिपक आरोळे व असिफ शेख दोघेजण तेथे आले. ईश्वर गर्जे व किरण बडे यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणाला व धमकी दिली. भागवत चेमटे, असिफ शेख, दिपक आरोळे व विष्णु बाबासाहेब ढाकणे (रा.टाकळीमानुर, ता.पाथर्डी) अशांनी कट रचुन विष्णु ढाकणे याच्या पेट्रोलपंपावर विक्रीसाठी डीझेल घेवुन जाण्याचा कट रचुन हा गुन्हा केला आहे. या डीझेल चोरीत पोलीस नाईक दिपक शेंडे याने मदत केल्याचे समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावुन घेवुन संबधितांना पकडण्याचे आदेश दिले. भागवत चेमटे याला निलेश म्हस्के व भगवान सानप यांनी तातडीने ताब्यात घेतले.आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस नाईक दिपक शेंडे यालाही ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी करताना भागवत चेमटे याने पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व पोलीस नाईक ईश्वर गर्जे यांना धमकी दिली. पोलीस नाईक ईश्वर गर्जे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भागवत चेमटे, असिफ शेख, दिपक आरोळे, विष्णु ढाकणे, दिपक शेंडे यांच्या विरुद्ध कट रचुन संगनमताने डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3,7 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. भागवत चेमटे याने यापुर्वीही पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळुचा ढंपर चोरण्याचा गुन्हा केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला टॅंकर पुणे येथील एका संजय डोंगरे (रा.बिबवेवाडी पुणे) याने विष्णु ढाकणे याला विक्री केलेला असल्याचे सांगण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण तपास करीत आहेत.
अन् पोलीस खात्याची अब्रु वाचली
पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळी एक टॅंकर आले. त्यातून तीन जणांनी एक पेट्रोलवर चालणारे इंजिन आणले. इंजिनच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात पकडलेले टॅंकरमधील बायोडीझेल टॅंकरमध्ये भरले.ते घेवुन जाण्याच्या तयारीत असतानाच रात्रपाळीला असणारे पोलीस नाईक ईश्वर गर्जे व किरण बडे पोलीस ठाण्यातून बाहेर आले. त्यांना पाहताच बायोडीझेल घेवुन जाणारे पळाले. हा टॅंकर पळविण्यात संबधित टोळीला यश आले असते तर पोलिसांची अब्रु कोणीही वाचवु शकले नसते. किमान चार पाच पोलीस याबाबत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी निलंबितही झाले असते. मात्र अखेर ईश्वरच धावला व पुढील अनर्थ टळला.