Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या शक्ती या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर राहुल यांनी पुन्हा निशाणा साधला. ( Narendra Modi On Rahul Gandhi )
त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर लगेचच मोदी विरूद्ध राहुल यांच्यात शाब्दिक युद्धाला तोंड फुटले आहे. सत्ताधारी आणि विरोधी गोटांमधील प्रमुख नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने प्रचाराला शक्ती मिळाल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्षांची आघाडी असणाऱ्या इंडियाने रविवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना राहुल यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यांनी प्रामुख्याने मोदींवर टीकेची झोड उठवली. आमचा लढा मोदी किंवा भाजपविरोधात नाही.
तर, मोदी ज्या शक्तीचा मुखवटा बनले आहेत; त्या शक्तीविरोधात आहे, असे राहुल म्हणाले. त्यानंतर मोदी यांनी सोमवारी तेलंगणा आणि कर्नाटकमधील सभांमध्ये बोलताना शक्ती या शब्दाचा खुबीने वापर करून राहुल यांचा शाब्दिक हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला.
माझ्यासाठी प्रत्येक माता, प्रत्येक कन्या शक्तीचे स्वरूप आहे. माता आणि भगिनींची मी शक्ती म्हणून पूजा करतो. भारतमातेचा मी पुजारी आहे. देशाने चांद्रयान मोहिमेचे यश शिवशक्तीला समर्पित केले.
मात्र, विरोधी पक्ष शक्तीला उद्धवस्त करण्याची भाषा करत आहेत. आताची निवडणूक म्हणजे शक्तीला उद्धवस्त करू पाहणारे आणि शक्तीची पूजा करणारे यांच्यातील लढाई आहे, असे भाष्य मोदी यांनी केले. ( Narendra Modi On Rahul Gandhi )