पुणे – हत्यारे आणण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप असलेल्याला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.अनिल वसंत पवार (रा. तळेगाव दाभाडे) याला विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी जामीन मंजुर केला आहे.
त्याने ॲड.सचिन झालटे पाटील आणि ॲड.अविष्कार धुमाळ यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 2५ जून २०२३ रोजी तळेगाव बस स्टॅण्ड परिसरात अल्टो कारमध्ये प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी हे जिवंत काडतुसे आणि गावटी कट्टे घेऊन आढळून आले.
त्यानंतर किशोर आवारे याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी संदीप गोरडे आणि सुधाकर शेळके या दोघांचा खून करण्यासाठी मध्य प्रदेश येथून हे कट्टे मागवल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पवार याला अटक केली. नंतर या प्रकरणात मोक्का लावण्यात आला होता. या प्रकरणात पवार याने जामिनासाठी अर्ज केला होता.
ॲड. सचिन झालटे पाटील यांनी युक्तीवाद केला की, किशोर आवारे याचा भर दिवसा खून करण्यात आल होता. आरोपी आवारे याचे जवळचे मित्र आहेत. त्याना दबाव टाकण्यासाठी खोट्या गुन्ह्यात गुंतविण्यात आले आहे. पोलिसांची ही कारवाई संशयास्पद आहे. त्यामुळे जामीन देण्याची मागणी करण्यात आली.