पुणे – बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग याच्या रविवारी झालेल्या सांगीतिक मैफिलीने तरुणांची रेकॉर्डब्रेक गर्दी अनुभवली. या वेळी शहरातील ३९ हजार उत्साही संगीतप्रेमींची अभूतपूर्व उपस्थिती लाभली. यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराने मनोरंजनाची राजधानी म्हणून आपले स्थान आणखी भक्कम केल्याचे दिसले.
या मैफिलीचे आयोजन डॉ. हेरंब शेळके, पेटीएम इनसायडरच्या वतीने करण्यात आले होते. संजय घोडावत ग्रुप आणि किंगफिशर यांच्या संयुक्त विद्यमाने टु बीएचके अल्फ्रेस्को, तसेच इम्पिरियल ब्लू सुपर हिट नाईट्स प्रस्तुत या कार्यक्रमाने एक उच्च दर्जाच्या सांगीतिक मैफिलीची प्रेक्षकांना मेजवानी दिली. या चार तासांच्या कार्यक्रमातील उपस्थितांचा प्रतिसाद देशातील इतर मैफिलींना कदाचितच मिळाला असेल. ही रसिकांची गर्दी लक्षात घेता पुणेकरांच्या उच्च दर्जाच्या मनोरंजनाची भूक अधोरेखित होते, असे संयोजक म्हणाले.
या कार्यक्रमात अरिजित सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण करून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला. नेत्रदीपक रंगमंच, रसिकांचा प्रतिसाद यामुळे वातावरणात वेगळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
यासंदर्भात आयोजक डॉ. हेरंब शेळके म्हणाले, पुण्यातील लोकांचा इतका अतुलनीय सहभाग आणि प्रतिसाद पाहून आम्हाला खूपच आनंद झाला आहे. हे यश केवळ अरिजित सिंगची लोकप्रियताच दर्शवत नाही, तर देशातील मनोरंजनाचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे नाव अधोरेखित देखील करते. या मैफिलीने पुण्यातील विविध संगीत रसिकांना एकत्र आणले. या कार्यक्रमाच्या उत्तुंग यशाने पुणे आणि देशभरात भविष्यातील लाइव्ह एंटरटेन्मेंटसाठी एक नवा बेंचमार्क सेट केला आहे.