मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला आर्यनला अखेर अटक केली आहे. अटकेनंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनला मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी नेले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. आर्यनने स्वत: ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघांची चौकशी झाली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. तिथे त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. कोर्टात आता नक्की काय घडेल ते पाहणे महत्त्वाचं आहे. पण गेल्या दोन वर्षातील ही मोठी हाय प्रोफाईल केस असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, शनिवारी दुपारी हे क्रूझ मुंबईवरून गोव्याला निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवस ही पार्टी चालणार होती. या पार्टीसाठी दिल्लीहून उद्योगपतींच्या तीन मुली आल्या होत्या. या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. एनसीबीने या मुलींचेही फोन जप्त केले आहेत. फोनमधील चॅटची तपासणी केली जात आहे. ड्रग्जप्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात कारवाई होणारच, असे एनसीबीने स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितले.
आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धनीचा, नुपुर सारिका, इश्मीत सिंह, विक्रांत चोकर, गोमित चोपड़ा, मोहक जसवाल या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या पार्टीत सहभागी होणाऱ्यांसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती, अशी माहितीही आता समोर आली आहे. या कारवाईत एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.