नवी दिल्ली – सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वा हंगाम अंतिम टप्प्यात असून स्पर्धेतील सर्व खेळाडूंना एक सुखद धक्का दिला गेला आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये खेळाडूंची होणारी उत्तेजक चाचणी म्हणजेच डोपिंग टेस्ट यावर्षी करण्यात येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वर्षी खेळाडूंना या चाचणीतून सूट देण्याचा निर्णय घेतला.
यावर्षी बीसीसीआयने युएईमध्ये स्पर्धेच्या उत्तरार्धासाठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) अधिकाऱ्यांना येण्यास प्रतिबंध केला आहे. अधिकाऱ्यांना बायोबबलमध्ये प्रवेश न दिला गेल्याने खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य चाचण्या होणार नाहीत. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यातही करोनामुळे डोप टेस्ट कमी झाल्या होत्या. मात्र, नाडाच्या डीसीओ (डोपिंग कंट्रोल ऑफिसर)ला करोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने चाचण्या पूर्णपणे बंद केल्या होत्या.
बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई, चेन्नई आणि दिल्ली येथे तीन डीसीएस (डोप कंट्रोल स्टेशन)ला परवानगी दिली होती. आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यात डीसीओला बायोबबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती.