नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर मागील महिन्यात 21 फेब्रुवारीला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी ही कारवाई केली. परंतु, या कारवाईवर आता उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याने डॉ. चौधरी यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अनिल किलोर आणि न्या. एम. जवळकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार 21 फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते.
मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांचावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे सोपवण्यात आला. परंतु, डॉ. सुभाष चौधरी यांनी उच्च न्यायालयात राज्यपाल यांच्या आदेशाला आव्हान दिले होते.
.