Wholesale inflation – महागाई नियंत्रणात ठेवण्यात केंद्र सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला बर्यापैकी यश मिळू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर कमी होऊन केवळ 0.2 टक्के इतका मोजला गेला आहे.
यामुळे लवकरच किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर कमी होईल आणि रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल अशी अशा व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. रिझर्व्ह बँक व्याजदर ठरविताना किरकोळ किमतीवरील आधारित महागाईच्या दराचा विचार करते. सध्या किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर पाच टक्क्याच्या जवळपास आहे. तो रिझर्व्ह बँकेला 4% पेक्षा कमी हवा आहे.
जानेवारी महिन्यामध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 0.27 टक्के होता. त्यामध्ये आता बरीच घट झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत हा दर शून्य टक्क्यापेक्षा कमी होता. नोव्हेंबर महिन्यापासून हा दर शून्य टक्क्यापेक्षा जास्त आहे. फेब्रुवारी 2023 महिन्यामध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 3.85% इतका होता. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवरही घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर कमी होत आहे.
विशेष म्हणजे अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमती फेब्रुवारी महिन्यात वाढल्या असूनही घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर मात्र कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अन्नधान्याच्या किमती फेब्रुवारी महिन्यात 6.95 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर भाजीपाल्याच्या किमती 18.48 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र उन्हाळ्याच्या काळामध्ये भाजीपाल्याच्या किमती वाढत असतात असे सरकारकडून सांगण्यात आले.
फेब्रुवारीत किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 5.09% इतका आहे. तो आता लवकरच 4% का होईल आणि जून नंतर व्याजदर कपातीची शक्यता खुली होईल असे काही विश्लेषकांनी सांगितले. मात्र जागतिक परिस्थिती खराब आहे. आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत भारतातील वस्तूच्या दरावर परदेशातील वस्तूंच्या दरांचा परिणाम होतो. त्यामुळे रिझर्व्ह बँक जास्त सावध राहून निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
(Wholesale inflation eases to 0.2% in Feb, food inflation rises marginally)