अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून नगरकरांची दिशाभूल 

-दिलीप सातपुते यांचा राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांच्यावर पलटवार

-न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुकीतही  खोटे गुन्हे  दाखल केल्याचा आरोप

आयुर्वेद महाविद्यालय व आ. कर्डिले यांच्या  बंगल्यातील डीव्हीआर दाखवा
केडगाव प्रकरणात कोणी म्हणत असेल की मी निर्दोष आहे तर त्यांनी आयुर्वेद महाविद्यालय, केडगाव येथील कोतकरांचा बंगला, तसेच बुऱ्हानगर येथील आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बंगल्यातील डीव्हीआर गायब केलेले आहे. तुम्ही जर निर्दोष असाल तर ते डीव्हीआर आणून दाखवा खरे काय चित्र समोर येईल. तसेच शिवसैनिकांच्या तीन नगरसेवकांबाबत जो प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे संभाजी कदम यांनी सांगितले.

नगर – बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी मंदिराकडे जाणारा रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या दालनात सुमारे दोन तास आंदोलन करण्यात आले. परंतु राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून नगरकरांची दिशाभूल केली आहे, असा पलटवार शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला.

आ. जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची पोलखोल केल्यानंतर आज पुन्हा सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. जगताप यांना लक्ष्य केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, श्‍याम नळकांडे, अनिल शिंदे, संजय ग्यानाप्पा, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, विक्रम राठोड, दत्ता कावरे, योगीराज गाडे, सुभाष लोंढे आदी उपस्थित होते

सातपुते म्हणाले, जनतेच्या प्रश्‍नांसाठी शिवसेना नेहमीच आंदोलन करते. शिवसेनेने कधीही कोणावर खोटा गुन्हा दाखल केला नाही. केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्या फिर्यादीमध्ये मुख्य आरोपींची नावे नव्हती. सीआयडीने तपास करून त्याचा शोध घेऊन मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. ते आरोपी ही सध्या फरार आहेत. आपल्याला कोणी क्‍लिनचिट दिला असे समजू नये, मुख्य आरोपींच तुमच नात काय आहे. सर्व नगरकरांना माहिती असून त्याचा सीआयडी शोध घेत आहे. राजकीय दबाव असल्याने या प्रकरणाचा प्रशासन ही व्यवस्थित तपास करीत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडीत नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी खोटे गुन्हे दाखल करते याचे अनेक पुरावे आहेत. गाडे म्हणाले की, आजपर्यंत माझ्यावर राष्ट्रवादीकडून 2 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एक म्हणजे न्यू आर्टस्‌ महाविद्यालयातील निवडणूक तर दुसरा म्हणजे केडगाव पोटनिवडणूक दरम्यान जे हत्याकांड झाले त्यांच्या विरोधात मी पुराव्या निशी गुन्हा दाखल केला. त्याचा राग मनात धरून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.