पुणे शहरातील अपघाती मृत्यूचे प्रमाण घटले

प्राणांतिक अपघातांमध्ये 50 टक्‍क्‍यांनी घट

पुणे – पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे प्राणघातक अपघातांचे प्रयत्न घटले आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश येत असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाती मृत्यूचे प्रमाण घटले आहे. एप्रिल 2018 मध्ये शहर परिसरात 20 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. जनजागृती, समुपदेशनाबरोबरच कारवाईचा बडगा यामुळे एप्रिल 2019 मध्ये हा आकडा 9 वर आला आहे.

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, रस्त्यांची रुंदी आहे तशीच आहे. यातच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडीचे प्रमाण वाढत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे बहुतांश अपघात होताना दिसतात. तर हेल्मेट परिधान न केल्यामुळे डोक्‍याला मार लागून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही दखल घेण्याजोगे आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचे व नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाची मदत घेण्यात येत असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ, अतिक्रमणे हटवणे, हेल्मेट वापरासाठी जनजागृती आदींवर भर देण्यात येत आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

मागील वर्षी एप्रिल 2018 मध्ये शहरात 20 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. तर, 35 गंभीर अपघातांत 51 जण जखमी झाले होते. मात्र, यावर्षी हे प्रमाण घटून एप्रिल 2019 मध्ये 9 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, 23 गंभीर अपघातांमध्ये 25 जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूणच प्राणांतिक अपघातांमध्ये 55 तर गंभीर अपघातांमध्ये जखमी होण्याच्या प्रमाणात यंदा 50 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

वाहतूक पोलिसांकडून कारवाईबरोबरच समुपदेशन, जनजागृती आदींवर भर देण्यात येत आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून परिणामी अपघातांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, असे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.