पुणे – अनाथ, भिक्षेकरी मुलांची नवी ‘उमेद’

वर्ध्याच्या वसतिगृहातील मुलांनी पहिल्यांदा पाहिले पुणे


मराठवाडा मित्र मंडळाने आयोजित केले निवासी शिबिर

पुणे – आई-वडिलांना पोरकी असलेली मुलं, पारधी समाजातील मुलं, काही भिक्षेकरी, तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करीत असलेल्या मुलांना खरा अर्थाने आश्रय दिला ते वर्धा येथील उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टने. हीच ती मुले विद्येच्या माहेघरात अर्थात पुण्यात येऊन शहरात फेरफेटका मारत आनंद लुटला. मागास भागात शिक्षण घेत असलेल्या या मुलांचे चेहरे पहिल्यांदाच शहरात आल्यानंतर आनंदाने खुलून गेले होते.

निमित्त होते होते मराठवाडा मित्र मंडळाने अनाथ, निराधार मुलांसाठी आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या निवासी शिबिराचे. उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या एकूण 38 मुलं-मुली शिबिरासाठी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयात आले होते. त्यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी प्रतिकूल परिस्थिती, त्यातून शिक्षणाची कास धरत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी त्यांची धडपड, तितक्‍याच आत्मियतेने त्यांना सर्व प्रकारच्या मदत करणाऱ्या ट्रस्टच्या संस्थापक मंगेशी सून यांचा हा प्रवास थक्‍क करणारा आहे.

मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी अनाथ मुलांसाठी शिबिरासाठी पुुढाकार घेतला. त्यांनी पुण्यातील विविध व्यक्‍ती आणि संस्थांशी संवाद घडविला. या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्यांसह शालेय साहित्याची मदत केली. एवढेच नव्हे, या सहा दिवसांत या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्‍तिमत्व विकास, संवाद कौशल्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच, या मुलांनी शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन त्याचा आनंद लुटला. दि. 6 मे पर्यंत ही मुले पुण्यात असून, त्यांचे सर्व नियोजन प्रा. रमेश पंडित करीत आहेत.

दानशुरांनी पुढे यावे
“अनाथ मुलांना मूळ प्रवाहात आणाऱ्या संस्थेचे काम काम लोकांनाही समजावे, हा शिबिराचा मुख्य हेतू आहे. वर्धातील वसतिगृहाच्या सर्व सुविधा नाहीत. या सुविधा पूर्ण करण्यात मर्यादा येतात. ते पूर्ण करण्यास आर्थिक मर्यादा येतात. त्यामुळे अशा संस्थांना अनेक दानशूर लोकांनी पुढे येऊन मदत करावी,’ असे आवाहन भाऊसाहेब जाधव यांनी केले.

सायकल चोरणारा अतुल होणार टेक्‍निशियन
मुंबईच्या स्टेशन परिसरात तब्बल 20 सायकली चोरी करताना सापडलेला अतुल भोसले हा विद्यार्थी वर्ध्यातील वसतिगृहात असून, तो इयत्ता नववीचे शिक्षण घेत आहे. तो वसतिगृहात रूळेल असे वाटत नव्हते. यापूर्वी कधीही त्याने शाळेची पायरी चढली नव्हती. आता मात्र तो थेट नववी इयत्तांत प्रवेश घेऊन चांगला अभ्यास करीत आहे. “मला टेक्‍निशयन विषयाची आवड असून, दहावीनंतर आयटीआय करून स्वत:चा रोजगार सुरू करणार,’ असा मनोदय अतुल याने व्यक्‍त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.