Ajit Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली.
मतदान करून आल्यानंतर मातोश्री आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना आशाताई म्हणाल्या,“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले”, असे आशाताई पवार यांनी यावेळी म्हटले
यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनीही अजितदादांच्या आईच्या इच्छेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही आईला वाटतं आपल्या मुलाने राज्याचं नेतृत्व करावं. त्यांनी इच्छा व्यक्त केली. दादांचा दांडगा अनुभव आहे. अजितदादा अनेक वर्षापासून काम करत आहे. सर्वांनी त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. आईने प्रामाणिकपणे इच्छा बोलून दाखवली आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.