Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला काही दिवसांपूर्वी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला होता. 47 वर्षीय श्रेयसने संपूर्ण दिवस शुटींग केली आणि त्यानंतर तो हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. अंधेरी पश्चिम येथील शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.
श्रेयसने आगामी ‘वेलकम टू द जंगल’साठी संपूर्ण दिवस शूट केले. त्याने दिवसभर चित्रीकरण केले, सेटवर देखील सगळ्यांशी हसून बोलत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. आणि शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
दरम्यान, आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द श्रेयसने त्या दिवशीचा सर्व अनुभव सांगितला आहे. ज्या दिवशी हार्ट अटॅक आला, तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला की, “आम्ही मुंबईत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. आर्मी ट्रेनिंगचा सीक्वेन्स होता आणि त्यामुळे पाण्यात पडणं, दोरीवरून उड्या मारणं असं सर्वकाही करत होतो.
पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना खूप त्रास जाणवला. माझा डावा हात प्रचंड दुखू लागला होता. मी माझ्या व्हॅनिटी वॅनपर्यंत कसाबसा गेलो आणि कपडे बदलले. ॲक्शन सीन्सचं शूटिंग केल्याने असं काही होत असावं असं मला वाटलं होतं. कारमध्ये बसल्यानंतर मी थेट रुग्णालयात जाण्याचा विचार केला. पण नंतर वाटलं की नाही, आधी घरी जावं.
माझ्या पत्नीने मला त्या स्थितीत पाहिलं आणि पुढच्या दहा मिनिटांत तिने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला रुग्णालयाचा गेट दिसत होता, पण एण्ट्रीजवळ बॅरिकेट लावल्याने यु-टर्न घ्यावा लागला. त्याच क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी बेशुद्ध झालो. तो कार्डिॲक अरेस्ट होता. माझं हृदय काही मिनिटांसाठी धडधडणं बंद झालं होतं.
आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, त्यामुळे दिप्ती तिच्या कारमधून बाहेर पडू शकत नव्हती. त्यावेळी काही लोकांनी मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात पोहोचवलं. डॉक्टरांनी मला तातडीने सीपीआर, इलेक्ट्रिक शॉक दिला. त्यादिवशी जणू जीवदान मिळाल्याचा अनुभव आल्याचं श्रेयसने सांगितलं.
तो पुढे म्हणाला की, “क्लिनिकली मी मृतावस्थेत होतो. कारण तेवढ्या तीव्रतेचा तो कार्डिॲक अरेस्ट होता. हा माझ्यासाठी वेक-अप कॉल होता असंच मी म्हणेन. आयुष्याने मला ही दुसरी संधी दिली आहे. माझं आयुष्य वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचा मी किती ऋणी आहे हे मी शब्दांत मांडू शकत नाही. अर्थात माझी सुपरवुमन पत्नीसुद्धा, तिने मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते’. अशा भावना श्रेयसने यावेळी व्यक्त केल्या.