पुणे – शहरात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने मटणाची चढ्याभावाने विक्री होत आहे. मटणाच्या विक्रीचा किलोचा भाव 800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर, चिकनची प्रतिकिलो 170 रुपये भावाने विक्री होत आहे.
राज्य सरकारने मटण, मांस विक्रीला परवानगी दिल्याने बहुतांश विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली आहेत. मात्र, संचार बंदीच्या काळात प्राण्यांच्या वाहतुकीला परवानगी नसल्याने बाजारात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम मटण आणि चिकनच्या भाववाढीवर झाला आहे, असे पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, गणेश पेठ येथील घाऊक बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात आहे. मात्र, सध्या शीतगृहातील मासळीची विक्री सुरू आहे. मासळीला मागणीही कमी आहे. त्यामुळे भाव टिकून असल्याचे ठाकूर परदेशी यांनी सांगितले.