मंचर,(प्रतिनिधी) – ऐन उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्षंमुळे अनेक पोल्ट्रीशेड बंद तसेच रमजान महिन्याचे उपवास आणि कांदा काढणी करिता आलेले मजूर, लोकसभेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चिकनला मागणी वाढल्याने ब्रॉयलर पोल्ट्री चालकांना अच्छे दिन आले आहेत. चिकनला सध्या उठाव असून घाऊक बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे.
जिवंत कोंबडीचा दर प्रति किलो 135 रुपयाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र चिकन शौकीन खवय्यांमध्ये बाजारभाव वाढल्याने मोठी नाराजी पसरली आहे. अचानक गेल्या आठवड्याभरापासून 200 रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो 240 रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे.
अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे ग्राहक सैरभैर झाले आहेत. उन्ह्याळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे . त्यामुळे बहुतांशी पोल्ट्री चालक आपले शेड बंदच ठेवतात. तसेच ज्या पोल्ट्री चालकाकडे पाणी आहे. त्यांनी पक्षी टाकले आहे, तेथे उष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मालाची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते.
बॉयलर कोंबडी तयार करण्यासाठी एक किलोला 80 ते 90 रुपये खर्च येतो. कोंबडीचे एक दिवसाचे पिल्लू 52 रुपये पर्यंत आहे. मका आणि सोयाबीन दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोंबडी तयार करण्यासाठी खर्चामध्ये वाढ झाली आहे.
त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये मोठी वाढ केल्याने बॉयलर कोंबडीचे चिकन 240 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकनचे व्यावसायिक इसाक शेख आणि घोडेगाव येथील बॉयलर कोंबडीचे होलसेल व्यापारी जावेद मिस्त्री आणि फिरेज मिस्त्री यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुका दरम्यान मालाचे कमतरता जाणवल्यास बॉयलर कोंबडीचे चिकन 250 ते 300 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गांना याचा फायदा होणार असल्याचे चांडोली येथील आदर्श महिला पोल्ट्री चालक वैशाली विजय थोरात आणि निरगुडसर येथील पोल्ट्री उत्पादक शेतकरी प्रकाश वळसे यांनी सांगितले.
एसी पोल्ट्री निर्मितीला वेग
पोल्ट्री व्यवसायात सध्या एसी पोल्ट्री निर्मितीसाठी चांडोली, कळंब परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेड तयार होत आहेत. यामध्ये ,तिरंगा उद्योग समूहाचे उद्योजक नितीन बाळू भालेराव, ऊस बागायतदार सचिन सूर्यकांत कानडे, प्रमोद पिंगळे, शंतनु भालेराव यांच्यासारख्या अनेक शेतकर्यांनी एसी पोल्ट्री फार्म तयार करण्याचे काम सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आहे.
अंड्यांचे दर गडगडले
पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन येऊ लागल्याने पोल्ट्री व्यवसायामध्ये अनेक शेतकरी सहभागी होताना दिसत आहे. चिकनचे दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांना सुद्धा 150 ते 170 रुपयात थाळी देणे आता कठीण होणार आहे. याउलट अंड्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून अंड्याचे दर 460 रुपये शेकड्यापर्यंत असून अंडी 72 डझनने विक्री होत आहेत. तसेच बकराच्या मटणालाही मागणी टिकून असल्याचे दिसून येत आहे. बकराचे दर 660 रुपये ते 700 रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याची माहिती एकलहरे येथील चाइस मटन व्यवसायिक व बकराचे व्यापारी शेखर कांबळे यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुका असल्यामुळे विविध गावात उमेदवारांकडून मांसाहारी पार्टी होत असल्याने चिकनला मागणी वाढली आहे .पुढील पंधरा दिवसात चिकनच्या बाजारभावात वाढ होईल असा अंदाज आहे.- शफीभाई मोमीन, आंबेगाव अॅग्रो, शिनोली
उन्हाळ्यामुळे बर्याच ठिकाणी पोल्ट्री बंद आहे. तसेच उष्णतेने ब्रॉयलर कोंबडीचे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने आणि निवडणुकांमुळे चिकनला मागणी वाढल्याने चिकनचे बाजारभाव कडाडल्याचे दिसून येते.- प्रमोद हिंगे पाटील, ऊर्जा फूडस, निरगुडसर