छत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केली दोन साथीदारांची हत्या

म्होरक्‍यांचा आदेश झुगारण्याची कृती जीवावर बेतली

रायपूर -छत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्याच दोन साथीदारांची हत्या केल्याची घटना घडली. रस्ता उखडून टाकण्याबाबत म्होरक्‍यांनी दिलेला आदेश झुगारण्याची कृती संबंधित नक्षलींच्या जीवावर बेतली.

छत्तिसगढच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यातील एका गावात नुकताच रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे विकासकामांना विरोध असणाऱ्या नक्षली म्होरक्‍यांचे पित्त खवळले. ते काही नक्षलवाद्यांसमवेत बुधवारी रात्री संबंधित गावात दाखल झाले. तिथे त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्या गावचे रहिवासी असणाऱ्या आपल्या दोन नक्षली साथीदारांना त्यांनी रस्ता उखडून टाकण्याचा आदेश दिला.

मात्र, रस्त्यामुळे रूग्णवाहिकेसारख्या अनेक सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध झाल्याचे सांगत त्यांनी म्होरक्‍यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या म्होरक्‍यांनी आपल्याच दोन साथीदारांच्या हत्येचा आदेश दिला. इतर नक्षलींनी त्याचे तातडीने पालन करत दोन साथीदारांना पकडून धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला.

त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना नक्षलवाद्यांनी मारहाण केली. त्यामध्ये तीन ग्रामस्थ जखमी झाल्याचे समजते. संबंधित धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी साथीदारांची हत्या करणाऱ्या नक्षलींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.