लोणंद – डोंबाळवाडी, ता. फलटण येथून आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या सचिन धायगुडे या युवकाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी राहुल नामदेव धायगुडे आणि प्रदीप दत्तात्रय टेंगले या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन धायगुडे (वय 35, रा. डोंबाळवाडी) हे गुरांच्या धारा काढण्यासाठी मंगळवारी (दि. 23 मे) सायंकाळी 6.30 च्या सुमारास शेतातील गोठ्यात गेले होते. ते त्याच रात्री 8 नंतर बेपत्ता झाले होते. याबाबतची फिर्याद नितीन धायगुडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सचिन धायगुडे यांचे नातेवाईक आणि लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांसह कसून शोध घेतला.
सचिन धायगुडे यांचा मृतदेह आज (बुधवार) कालव्याजवळच्या सार्वजनिक विहिरीत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल धायगुडे आणि प्रदीप टेंगले यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, दोघांनी खुनाची कबुली दिली आहे. शेतात सायफन पाइप टाकण्यावरून असलेल्या वादातून सचिन धायगुडे यांचा गळा दाबून खून केला आणि त्यांचा मृतदेह बंद असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत टाकला, असे या संशयितांनी पोलिसांना सांगितले. सपोनि विशाल वायकर तपास करत आहेत.