पुणे – “संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. त्यागाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. स्वत:वरील भक्कम विश्वास हेच यूपीएससीच्या यशाचे गमक आहे,’ असे मत पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केले आहे. “यूपीएससी निकालात यशस्वी उमेदवारांनी परीक्षेच्या तयारीच्या काळात केलेला त्याग महत्वाचा ठरतो,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या द युनिक अकॅडमीच्या यूपीएससी निकालातील यशवंत उमेदवारांच्या सत्कार समारंभात ढाकणे बोलत होते. यावेळी युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील यांच्यासह शिक्षक, उमेदवार उपस्थित होते. “यूपीएससीमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढावे यासाठी द युनिक अकॅडमी सुरूवातीपासून प्रयत्न करीत आहे. परीक्षेच्या गरजा ओळखून केले जाणारे मार्गदर्शन आणि दर्जेदार संदर्भसाहित्य यामुळे विद्यार्थ्यांचे यश सुकर होत असल्याचे सांगत ढाकणे यांनी द युनिक अकॅडमीचे अभिनंदन केले.
सन 2022 च्या यूपीएससी निकालात द युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या 45 उमेदवारांची निवड झाली आहे. या उमेदवारांचा सत्कार व अनुभवकथन कार्यक्रम पार पडला.तळागाळातील विद्यार्थ्यांनी यूपीएससीमध्ये मिळविलेले यश हे अभिमानास्पद आहे. यूपीएससी निकालात मराठी टक्का वाढविण्यासाठी “युनिक’ करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती तुकाराम जाधव यांनी दिली. यावेळी यशवंत उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन महेश शिरपूरकर यांनी केले. आभार भारत पाटील यांनी मानले.
यशस्वी उमेदवारांचे मनोगत आणि मार्गदर्शन
उमेदवारांनी यूपीएससी तयारीची प्रक्रिया विशद करून नव्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. युनिक अकॅडमीमधील सर्व शिक्षकांचे नियमित यूपीएससी मार्गदर्शन वर्ग, अद्ययावत संदर्भसाहित्य, परीक्षाभिमुख सराव चाचण्या व विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष यांमुळे यश सुकर होत असल्याची भावना यशवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. वसंत दाभोलकर, जैनम जैन, प्रतीक जराड, सोहम मांढरे, शृतिषा पठाडे, मंगेश खिलारी, ओमकार गुंडे, सागर खर्डे, मोहम्मद हुसेन, राजश्री देशमुख, अक्षय नेर्ले, सागर देठे, आदित्य पाटील, तुषार पवार या यशवंतांनी सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.
यूपीएससी परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, यासाठी द युनिक अकॅडमी सातत्याने प्रयत्नशील आहे. युनिक अकॅडमीने प्रकाशित केलले एनसीईआरटी आधारित पुस्तक मालिका, पॉलिटिकल सायन्स थ्रू क्वशन्स अँड अन्सर्स, अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लीफाइड, पंतप्रधान पीक विमा योजना-महाराष्ट्र एक मूल्यमापन ही पुस्तके यूपीएससी आणि वर्णनात्मक एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरतील.
– तुकाराम जाधव,संचालक, द युनिक ऍकॅडमी