पुणे – महापालिका प्रशासनाने एप्रिल आणि ऑगस्ट 2022 मध्ये तब्बल लाखभर पुणेकरांची करसवलत काढून घेतली. त्यानंतर गोंधळ झाल्याने आयुक्तांनीच “ही तांत्रिक बाब असून पुणेकरांनी पैसे भरू नयेत’ असे आदेश काढले. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शासनाकडे ही बाब मांडत निर्णय होईपर्यंत वसुली करू नये, अशा सूचना केल्या. मात्र, डिसेंबर 2022 मध्ये महापालिकेने हजारो मिळकतींची 40 टक्के सवलतच रद्द केल्याचे समोर आले आहे. दि.15 मेनंतर ऑनलाइन बिले पाठविण्यात येत असून, यामध्ये ही रक्कम वाढलेली आहे. यातून महापालिकेने पुणेकरांवर “करधाड’ टाकल्याची टीका होत आहे.
शहरात 1970 पासून निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत दिली जात होती. सन 2019 पासून नवीन मिळकतींना देणे बंद करण्यात आले. मात्र, त्या पूर्वीच्या कोणत्याही मिळकतीची ही सवलत रद्द केलेली नव्हती. एप्रिल आणि ऑगस्ट 2022 मध्ये महापालिकेने खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाचा आधार घेत तब्बल 97 हजार पुणेकरांची 40 टक्के सवलत रद्द केली.
त्यावरून गोंधळ झाला. पालकमंत्री पाटील यांनी मध्यस्थी करत शासनाकडे याबाबत बैठक घेऊन सवलत कायम ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आयुक्तांनीही खुलासा करत ही करवाढ थांबवली. हा प्रश्न एप्रिल 2023 मध्ये निकाली निघाला. राज्यशासनाने 2019 पासूनच्या मिळकतींनाही सवलत द्यावी, तसेच ज्या 97 हजार मिळकतींची सवलत रद्द केली आहे, त्यांच्याही फरकाची रक्कम माफ केली. त्यामुळे सरसकट सर्व मिळकतींना 40 टक्के सवलतीचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र, हा निर्णय शासनाकडे प्रलंबित असतानाच महापालिकेने पुन्हा सर्वेक्षणाचा आधार घेत डिसेंबर 2022 मध्ये हजारो मिळकतींची ,40 टक्के सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे 2022-23 च्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सवलत कायम असलेल्या नागरिकांना आता अचानक 40 टक्के कर वाढून आला आहे.
हेलपाटे, मनस्ताप…
अचानक 40 टक्के बिल वाढल्याने नागरिक हवालदिल झाले असून, महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. तर, सर्वेक्षणाचा
आधार घेत हे बिल वाढल्याचे प्रशासन सांगत त्यापेक्षा अधिक माहिती देण्यास तयार नाही. परिणामी, बिलात स्पष्टता नाही. त्यामुळे ही सरळसरळ फसवणूक असल्याचा राग व्यक्त केला
जात आहे.
मला मागील वर्षी 40 टक्के सवलत कायम होती. त्यानुसार मी दोन सहामाहीत बिल भरले. मात्र, यंदा अचानक
40 टक्के निवासी सवलत आणि 5 टक्के देखभाल दुरुस्तीची सवलत रद्द झाल्याने माझा 4 हजार रुपयांचा कर मला थेट 20 हजार आला आहे. चौकशी केली असता, माझ्या घरात भाडेकरू असल्याचे सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात मी 15 वर्षांपासून स्वत: राहत आहे. माझ्याकडे कोणीही सर्वेक्षणासाठी आलेले नाही.
– अजय जाधव, नागरिक, वडगाव