कात्रज/धनकवडी –त्रिमूर्ती चौक ते राजमाता जिजाऊ भुयारी पुलापर्यंत ते भारती विद्यापीठ परिसरातील सरहद कॉलेज चौक, चंद्रभागा नगर चौक व इतर बाजूच्या सोसायट्या समोरील रस्त्यालगतचे अनिधिकृत फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन यावर कारवाई करीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे एकूण 12 हजार स्क्वेअर फुट अतिक्रमण हटविण्यात आले.
कात्रज, धनकवडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पत्रा शेड बोर्ड व अनधिकृत 40 ते 45 शेड, शॉप हटविण्यात आले. कार्यकारी अभियंता हर्षदा शिंदे, उपअभियंता चंद्रसेन नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता राजेंद्र काथवटे व कनिष्ठअभियंता अभिजीत भुजबळ, अभियंता अक्षय देवकर, विभागीय अतिक्रमण अधिकारी कुंभार यांनी कारवाई केली. या कारवाईत 35 मजूर कर्मचारी, जेसीबी, गॅस कटर, 6 डंपर यांच्यासह स्थानिक पोलीस, वार्ड अतिक्रमण विभाग कर्मचारी सहभागी झाले होते.
नोटीस देऊनही अतिक्रमण हटविले नाही, अशा दुकानदारांचे शेड पत्रे, खुर्च्या आणि टेबल जप्त करण्यात आले. दोन वर्षातील ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल्स व दुकाने यांच्यासमोर अनेक ग्राहक रस्त्यापर्यंत वाहने लावल्याने परिणामी वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत सोसायटीच्या तर्फे बांधकाम विभागाला तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरामध्ये भारती विद्यापीठातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वास्तव्यास असल्याने त्यांची वर्दळ येथे असते, त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व इतरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कारवाई करण्यात आली, असे शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे यांनी सांगितले.