मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले. लगोलग मलिक यांनी फ़डणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांना गर्भीत इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला. तसेच मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषींसोबत त्यांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. मलिक यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, उद्या मुंबईत आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत. त्यासाठी फडणवीसांनी तयार राहावं, असही मलिक म्हणाले.
जागेच्या व्यवहारावरून तुम्ही माझ्यावर आरोप केले. मात्र तुम्हाला माहिती पुरवणारे कमजोर खिलाडी आहेत. मला म्हटले असते तर मीच सगळे कागदपत्र दिले असते. मात्र तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केला आहे. मुंबईत उद्या सकाळी १० वाजता, देवेंद्रजींचा अंडरवर्ल्डचा काय खेळ आहे, मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने कस संपूर्ण शहराला ओलिस ठेवलं होतं, हे सगळ आपण सांगणार आहोत.
दीड लाख फूट जमिन माफियाकडून कमडीमोल दराने खरेदी केल्याचा आरोप केला. त्यात खोटे भाडेकरू दाखविण्यात आले. मात्र तुम्ही स्वत: जावून पाहू शकता, असं मलिक यांनी म्हटलं. तसेच फडणवीसांनी केलेले सर्व आरोप मलिक यांनी फेटाळून लावले. तसेच आपल्याविरुद्धची कागदपत्र तपास यंत्रणांना द्या आपण घाबरत नाही, अस आव्हानही मलिक यांनी दिले.