लखनऊ – सुलतानपूरमध्ये 16 नोव्हेंबरला पूर्वांचल एक्स्प्रेस-वेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमा करण्याची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सुमारे 2 लाख लोकांना आणले जाणार आहे. या लोकांची ने-आण करण्यासाठी सुलतानपूरच्या डीएमने 2 हजार बसेस देण्यास सांगितले आहे.
सुलतानपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने रोडवेजच्या व्यवस्थापकीय संचालकांना बसेसची व्यवस्था करण्यासाठी पत्र लिहिले आहे, म्हणजेच हा कार्यक्रम सरकारी खर्चाने आयोजित केला जात आहे. उत्तर प्रदेश एक्सप्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरण (UPEIDA) बसेसचा खर्च करणार आहे.
– आजूबाजूच्या जिल्ह्यातील सभेला येणार लोक
सुलतानपूरचे जिल्हाधिकारी रवीश गुप्ता यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी लोकांना सार्वजनिक सभेच्या ठिकाणी नेण्यासाठी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळ लखनऊच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून 2 हजार बसेस मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 70 टक्के बसेस सुलतानपूर येथून पाठवल्या जाणार असून उर्वरित 30 टक्के बस आंबेडकर नगर आणि अयोध्येतून पाठवण्यात येणार आहेत. बसेसची मागणी निश्चितच करण्यात आली आहे, परंतु हा कार्यक्रम उत्तर प्रदेश एक्सप्रेस-वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (UPEIDA) द्वारे आयोजित केला जात आहे. त्यामुळे, यासाठीचा लागणारा खर्च upeida कडून करण्यात येणार आहे.
आरएमपरिवाहन निगम अयोध्या मंडळाचे एसपी सिंह म्हणाले, 400 कि.मी. पर्यंत एका दिवसासाठी एका रोडवेज बसचा खर्च सुमारे 24 हजार रुपये आहे. त्यानुसार बसेसच्या वाहतुकीसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
– एक्स्प्रेस वेच्या हवाई पट्टीवर उतरणार लढाऊ विमाने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 16 नोव्हेंबरला प्रस्तावित आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत ते शासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर 12 किंवा 13 नोव्हेंबरला हवाई दल फायटर विमाने हवाई पट्टीवर उतरवून चाचणी घेणार आहेत.