नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी 2020 सालातील पुरस्कार वितरित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये देशाची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू मेरिकोमला पद्मविभूषण तर, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील एकूण सात खेळाडूंना या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यापूर्वी या पुरस्कारांचे वितरण आभासी पद्धतीने करण्यात आले होते.
मेरीकोमला 2020 सालातील कामगिरीसाठी पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. मेरीकोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक पटकावले होते. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू झहीर खानला 2020 सालच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मणिपूरची फुटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे माजी हॉकीपटू एम. पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. भारताचा अव्वल नेमबाज जितू रायलाही पद्मश्री पुरस्कार प्रदान केला गेला.
भारताचा तिरंदाज तरुणदीप रायलाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षीच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचाही गौरव केला गेला. तिच्या नेतृत्वात यंदा भारताचा महिला हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.