पाकिस्तानपुढे गंभीर संकट
रावळपिंडी, दि. 29 – काल माजी पंतप्रधान झुल्फिकारअली भुट्टो यांनी प्रमुख लष्करी प्रशासक झिया उल हक यांची भेट घेतली. दोन तासांच्या या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना भुट्टो म्हणाले की, देशापुढे सध्या गंभीर संकट उभे आहे.
पुणे व प्राचीन धार्मिक स्थाने
पुणे – चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांनी लिहिलेल्या “पुणे व प्राचीन धार्मिक स्थाने’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना महसूल मंत्री मधुकर चौधरी म्हणाले, धार्मिक वास्तूंत माणूस आपल्या श्रद्धा पाहत असतो व त्यातून शक्ती घेऊन आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो, या दृष्टिकोनातून या धर्मस्थानांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न झाला तर मानवी जीवन अधिक सुसंपन्न होऊ शकेल.
विठ्ठलराव विखे पाटील यांच्या चरित्राचे प्रकाशन
पुणे – वर्षानुवर्षे सावकारी पाशात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी कारखानदारी सुरू करून नवा अध्याय सुरू केला, असे उद्गार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी काढले. काल येथे विखे पाटील यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग. दि. माडगूळकर होते.
“भूमिपुत्र’ नावाचे हे चरित्र राजा मंगळवेढेकर यांनी लिहिले आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या निर्मितीत खेडुतांचा विश्वास संपादन करीत असताना विखे पाटील यांचे दूरदर्शित्व, कर्तृत्व व परोपकार हे गुण दिसून आले, असेही प्राचार्य भोसले आपल्या भाषणात म्हणाले.